भावेश भाटिया, महाबळेश्वर
२०१० मध्ये मी, माझी
पत्नी सोहिनी व
मुलगा अपार सातारा
येथे एका कार्यक्रमानिमित्त गेलेलो होतो. एक दिवस
थोडा मोकळा होता
व अपारची महाबळेश्वर
बघण्याची फार तीव्र इच्छा होती, म्हणून
आम्ही सकाळीच साताऱ्याहून निघालो. महाबळेश्वरमध्ये
प्रवेश करण्याच्या रस्त्यावरच भावेश
भाटिया यांचे मेणबत्ती बनविण्याचे
वर्कशॉप आहे, तिथे
१०-१५ मिनिटांसाठी
जावू व नंतर
पॉईंट्स बघू या म्हणून आधी भावेशकडे
गेलो. भावेश भाटिया
नावाच्या अतिशय गोड व्यक्तिमत्वाच्या
अंध व्यक्तीची झालेली ती
पहिली भेट. तेथे त्यावेळी २५० प्रकारच्या सुगंधी
व डेकोरेटिव्ह मेणबत्त्या
तयार केल्या जायच्यात. ते सर्व भावेशने
आम्हाला अतिशय जिव्हाळ्याने दाखविले. तो व त्याची पत्नी नीतासोबत बराच वेळ बोलत बसलो.
दोन तास कसे
गेलेत ते कळलेच
नाही. तेथून निघताना
माझा २० वर्षांचा
मुलगा अपार म्हणाला
कि, बाबा आता
महाबळेश्वरचे इतर पॉईंट्स
नाही बघितले तरी
चालेल. भावेशकडे आलो यातच
सगळे महाबळेश्वर पाहण्याचा
आनंद व समाधान
मळाले. जो अपार
अतिशय आतुरतेने महाबळेश्वर
पाहण्यासाठी म्हणून उत्सुक होता
त्याचे हे उद्गार
होते; आणि खरोखरच
आता महाबळेश्वराच्या पॉइंट्समध्ये
भावेश भाटिया यांच्या
सनराईज कॅण्डल व वॅक्स
संग्रहालय हा नवीन
पॉईंट जोडल्या गेले
आहेत.
भावेश मुळचा कच्छमधील.
वडील उपजिवीकेसाठी महाराष्ट्रात
गोंदियाला आलेले. भावेशची दृष्टी
शाळेत असतानापासूनच त्याला
असलेल्या रेटिनाच्या आजारामुळे कमीकमी
होत चाललेली. शाळेतील
इतर मुले त्याला
आंधळा म्हणून चिडवायची.
१५-१६ व्या
वर्षी तर पूर्णतः
अंधत्व आलेले. मात्र त्याची आई त्याला
म्हणायची तुला जग
पहाता येत नसले
म्हणून काय झाले,
असे काहीतरी कर
कि संपूर्ण जग
तुझ्याकडे पाहायला लागेल. आईचे
हे उद्गार त्याच्यासाठी
कायम प्रेरणा देत
राहिले. त्यामुळेच कदाचित भावेश
पुढील आयुष्यात जगासाठी
एक रोल मॉडेल
बनला. दुर्दैवाने त्याची
आई पण याच
दरम्यान कॅन्सरने गेली. तिच्या
उपचारात बराच खर्च
झाल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती
पण ढासळली होती.
ते गोंदिया सोडून
महाबळेश्वरला आलेत. तेथे उपजीविकेसाठी मिळेल ते काम
केले. भावेश लहानपणापासून
कल्पक व सृजनशील
होता. तो खेळणी,
पतंग इ. अनेक कलात्मक वस्तू बनवायचा.
तो १९९९ मध्ये
मुंबईच्या नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमध्ये
मेणबत्त्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून
गेला. पण अंधांना
हे काम जमत
नाही म्हणून मेणबत्तीऐवजी त्याला मसाजिंग प्रशिक्षणाला
प्रवेश देण्यात आला. मसाजचे
प्रशिक्षण घेत असताना
मेणबत्ती शिकवणाऱ्या शिक्षकांना
मोफत मसाज
करुन त्यांच्याकडून त्याने
मेणबत्ती बनवायचे तंत्र आत्मसात
केले. प्रशिक्षण पूर्ण
करून महाबळेश्वरला परत
आल्यावर तो मसाजिंगचे
काम करू लागला.
पण मेणबत्ती बनविण्याचे
त्याचे स्वप्न त्याला स्वस्थ
बसू देत नव्हते.
त्याने घरच्या घरी मेणबत्त्या
बनवून पाहणे सुरु
केले व बाजारात
५० रु. रोजाप्रमाणे
भाड्याने घेतलेल्या ठेल्यावर त्या
तो विकू लागला.
एक दिवस असाच भावेश बाजारात आपल्या ठेल्यावर मेणबत्या विकत होता. त्यादिवशी महाबळेश्वरला हवापालट करण्यासाठी म्हणून काही दिवस रहायला आलेली नीता नामक युवती फिरत फिरत त्याच्या ठेल्याजवळ आली. एक अंध व्यक्ती मेणबत्त्या विकतोय हे पाहून तिला आश्चर्य वाटले. तिने भावेशबद्दल सविस्तर चौकशी केली. भावेशचा प्रामाणिकपणा, जिद्द पाहून ती प्रभावित झाली व दररोज त्याच्या कामात त्याला मदत करायला म्हणून येऊ लागली. हळूहळू दोघांची मैत्री झाली व ते प्रेमात कधी पडले हे त्यांना कळलेच नाही. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका अंध मेणबत्ती बनवून विकणाऱ्या गृहस्थाबरोबर, सर्व काही व्यवस्थित असलेली नीता लग्न करते म्हटल्यावर तिला कुटुंबियांच्या विरोध होणे स्वाभाविकच होते; पण नीता आपल्या निर्णयावर ठाम होती. तिने आपल्या आईवडिलांना राजी केले. वर्षभरानंतर त्यांचे लग्न झाले. लग्न करून त्यांनी महाबळेश्वरलाच एका छोट्याशा घरात संसार थाटला. अन्न ज्या भांड्यांमध्ये शिजवायचे त्याच भांड्यात मेणबत्त्या बनविण्यासाठी मेण वितळविले जायचे. कारण त्यासाठी वेगळी नवीन भांडी खरेदी करण्याची पण त्यांची परिस्थिती नव्हती. मात्र आता नीता सोबत आल्याने भावेशच्या कामाला चांगलीच गती आली व त्यांचा व्यवसाय वाढू लागला. हळूहळू दोघांनी कष्टातून एक दुचाकी वाहन खरेदी केले. लग्नापूर्वी सायकलसुद्धा चालविता न येणारी नीता आता दुचाकी व पुढे चारचाकी वाहन पण चालवायला शिकली.
भावेशने सुरुवातीला अनेक मेणबत्ती निर्माते आणि संस्थांकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न केला. परंतु म्हणावा तास प्रतिसाद मिळाला नाही. बँकेत कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला, परंतु त्यांनीही नकार दिला. भावेश नीतासोबत मॉलमध्ये जाऊन तेथे विक्रीसाठी ठेवलेल्या मेणबत्त्यांना स्पर्श करून, त्यांचा आकार आणि बनावट समजून घ्यायला लागला. अशाप्रकारे मेणबत्ती बनविण्याचे कौशल्य त्याने हळूहळू आपल्या कल्पकतेने विकसित करीत नेले. पुढे एका बँकेने त्याला १५ हजार रुपये कर्ज दिले. त्यातून त्यांनी कच्चा माल व साचे खरेदी केले व सनराइज कँडल हि कंपनी सुरु केली. आज या कंपनीचा वार्षिक टर्नओव्हर २५ कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला आहे. ५ किलो मेणापासून सुरुवात केलेल्या भावेशला आता दररोज १२५ क्विंटल मेण मेणबत्त्या बनविण्यासाठी लागते. मेणबत्ती बनविण्यामध्ये स्वतःची कल्पकता व सृजनशीलता वापरून विविध प्रकारच आकर्षक सुगंधी व शोभनीय मेणबत्त्या ते बनवू लागले. हळूहळू त्यांच्या मेणबत्यांना गमाहक आवर्जून खरेदी करू लागले. ठेल्यावर होणारी विक्री पुढे दुचाकी व नंतर व्हॅनमधून होणे सुरु झाले.
आज जवळपास १०००० विभिन्न प्रकारच्या मेणबत्त्या भावेशची कंपनी तयार करते. त्याच्या कंपनीत काम करणारे बहुतेक सर्व कर्मचारी अंध आहेत. आतापर्यंत देशभरातील २३०० अंधांना भावेशच्या कंपनीच्या मार्फत प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. एकूण ७० अंधांसाठी निवासी प्रशिक्षणाची व्यवस्था भावेशच्या कंपनीमार्मत महाबळेश्वर येथे सध्या उभी करण्यात आलेली आहे. त्यांना भोजन-निवास व्यवस्थेशिवाय त्यांना स्टायपेंड पण प्रशिक्षण कालावधीमधे दिले जाते. आपापल्या गावी परत गेल्यावर मेणबत्त्या बनविण्यासाठी आवश्यक ती मदत-मार्गदर्शन सुद्धा पुरविले जाते.
अंध व्यक्तिना डोळे नसले तरी अंत:चक्षूंनी ते जग पाहू शकतात, हे भावेशने सिद्ध करून दाखवले आहे. या व्यवसायाने भावेशचे नाव देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर पोहोचले आहे. भावेशने मोठ्या कठीण परिस्थितीत सुरु केलेला व्यवसाय यशस्वी करून दाखवला आहे. आज रिलायन्स इंडस्ट्रीज, रॅनबॅक्सी, बिग बाजार, नरोदा इंडस्ट्रीज आणि रोटरी क्लब सारखे मोठे ब्रॅण्ड्स त्यांचे नियिमत गमाहक आहेत. आज संपूर्ण देशभरात तसेच जगातील ६० देशांमध्ये त्यांच्या मेणबत्त्या निर्यात केल्या जातात. या सर्व कामात भावेशची पत्नी नीता हिची खूपच मोलाची व महत्वाची भूमिका राहिलेली आहे. आज ती कंपनीची प्रशासकीय जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहे. दृष्टीहीन तरुणांना स्वावलंबी बनविणे हे नीता आणि भावेश यांनी आपल्या जीवनाचे उद्दिष्ट मानले आहे व ते त्यासाठी सतत प्रयत्नरत आहेत.
भावेश गोंदियाला शाळा शिकत असतांनाच त्याची दृष्टी कमी व्हायला लागली होती. मात्र भावेश लहानपणापासूनच धाडसी स्वभावाचा होता. सायकल चालविणे, आसपासच्या टेकड्या-डोंगर चढणे, मनापासून निसर्गाचा आनंद व आस्वाद घेणे हा त्याचा स्वभाव होता. १९८८ साली वयाच्या सतराव्या वर्षी अकरावीला असतांना त्याने ठरविले की राष्ट्रीय एकात्मता हा विषय घेवून गोंदिया ते काठमांडू-नेपाळ अशी सायकलने यात्रा करायची. त्याच्यासोबत पोलिओ झाल्यामुळे पायांमध्ये ताकद नसणारा त्याचा मित्र पम्मी मोदी व दिनेश पटेल हा डोळस मित्र पण तयार झाला. त्यांनी सायकलमध्ये काही बदल करवून दोन पायडल व काही गिअर्स बसवून घेतले. पाय वापरु न शकणारा त्याचा मित्र पम्मी समोर बसून हँडल पकडायचा. भावेशला दिसत नसल्यामुळे तो मागे बसायचा व पायडल मारायचे काम करायचा. अशी डबलसीट साकयल चालविण्यासाठी बराच काळ त्यांनी सराव केलेला. गोंदिया ते काठमांडू व परत अशी ५६२० किमीची सायकलयात्रा त्यांनी ४५ दिवसात पूर्ण केली. दिनेश पटेल हा डोळस मित्र पण दुसऱ्या सायकलवर त्यांच्यासोबत यात्रेमध्ये होता. या सायकल यात्रे दरम्यान भावेशच्या पुढील आयुष्यातील वाटचालीची बरीचशी बीजे रुजल्या गेलीत. या जगामध्ये चांगुलपणा सगळीकडे ठासून भरलेला आहे, वाईट माणसांची संख्या ही चांगल्यांच्या तुलनेत खूपच कमी आहे हे तो शिकला. नाना प्रकारच्या अडचणींना सामोरे कसे जावे, आपल्या उद्दीष्टांसाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी, लोकांचे सहकार्य कसे मिळवावे इ. शिकलेल्या अनेक गोष्टी पुढील आयुष्यात त्याला उपयोगी पडल्यात.
१९९९ साली भावेशने प्रथमच दिव्यांगांसाठी जिल्हास्तरावर होणाऱ्या क्रिडा स्पर्धेमध्ये वाच २८ व्या वर्षी भाग घेतला. सातारा जिल्हास्तरावरील या स्पर्धेमध्ये त्याने अनेक क्रिडाप्रकारांमध्ये सहभाग नोंदवला व तेथून त्याच्या क्रिडा क्षेत्रातील वाटचालीला सुरुवात झाली. आतार्पंयत थालीफेक, गोळाफेक व भालाफेक यामध्ये त्याने राज्य व राष्ट्रीय स्तरावरील ११४ पदके प्राप्त केलेली आहेत. नुकतीच त्याची २०२० साली टोकिओ येथे होणार्या पॅराऑलिम्पिक स्पर्धेसाठी आपल्या देशातर्फे निवड झालेली आहे. देशासाठी सुवर्णपदक आणण्याचा त्याचा संकल्प असून त्यासाठी तयारी सुरू केलेली आहे. एकीकडे आपल्या सनराईज कॅन्डल या कंपनीला भरभराटीला घेवून जात असतांना, सोबतच त्याची या स्पर्धांसाठीची तयारी पण तेवढ्याच जोमाने सुरु आहे.
२००८ मध्ये वयाच्या चाळीशीमध्ये ते काश्मीरला श्रीनगर-सोनमर्ग-कारगिलला गेले असता, हिमालयाच्या शिखरांनी त्याला साद दिली. लहानपणी जवळपास डोंगरांवर चढण्याचा उद्योग भरपूर केलेला. आता वयाच्या चाळीशीनंतर पुन्हा मित्रांसोबत ट्रेकिंग व गिर्यारोहणाला सुरुवात केली. आतापर्यंत सह्याद्री पर्वताचे सर्वात उंच शिखर कळसूबाई सहा वेळा चढून झाले. हिमालातील कांगरा हे ६१२० मीटर उंचीचे शिखर पण काबीज झाले. आता पुढची चढाई ही ६७५० मीटर उंचीच्या मीरा या शिखरावर होणार आहे. २०१९ मध्ये जगातील सर्वात उंच शिखर माऊंट एव्हरेस्ट काबीज करण्याचा भावेशचा संकल्प आहे. त्यावेळी बहुधा तो माऊंट एव्हरेस्ट चढून जाणारा जगातील पहिला दृष्टीहिन व्यक्ती असेल.
सन २०१९ ची माऊंट एव्हरेस्ट मोहिम व २०२० मधील टोकिओ पॅराऑलिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदक या ध्येयासाठी भावेश स्वत:ला तयार करतो आहे. त्यासाठी त्याचा दररोज मैदानावर कठोर परिश्रम व सराव सुरु असतो. रोज ८-१० किमी धावणे, ५०० पुशअप्स व शारिरिक तंदुरुस्तीसाठीची अन्य साधना त्याची अव्याहतपणे सुरु आहे. पोलो मैदानावर धावण्याच्या सरावासाठी त्याची पत्नी नीता गाडी ड्राईव्ह करते, गाडीला मागे एक १५ मुटाचा दोर बांधलेला असतो, तो हातात धरुन भावेशने गाडीच्या मागे धावायचे अशी त्याची दररोजची सर्कस सुरु असते. भावेश गमतीने सांगतो की मला माझ्या पत्नीशी खूप सांभाळून वागावे लागते. कारण एखादं दिवशी काही कमीअधिक झाले तर सकाळी धावतांना ती गाडीचा वेग वाढवून देणचा धोका असतो !
एकदा रिलायन्सतर्फे भावेशचा सत्कार केला
गेला व त्याला
मदत म्हणून ५१
लाखांचा चेक दिला
गेला. भावेशने तो नम्रपणे परत केला
व त्याऐवजी रिलायन्सने
त्याला काम द्यावे
अशी विनंती केली.
अशाप्रकारे दिलेला चेक नाकारणारी
व्यक्ती कदाचित रिलान्सला पण
क्वचितच भेटली असावी. बर्याच बैठकांनंतर
भावेशच्या कंपनीला रिलायन्सकडून काम मिळाले व नंतर त्यांच्या कामाच्या गुणवत्तेच्या आधारावर दरवर्षीच मिळत गेले.
त्या नाकारलेल्या ५१
लाखांच्या चेकच्या बदल्यात गेल्या
काही वर्षात त्याने
रिलायन्सकडून कैक कोटी
रुपयांच्या आर्डर्स मिळवून पूर्ण
केल्यात; यामध्ये भावेशची दूरदृष्टी
व भक्कम व्यावसायिक
दृष्टीकोन लक्षात येतो.
मेणबत्या तयार करतांना जे मेण वाया जायचे त्याचे काय करावे हा मोठा प्रश्न त्यांच्यापुढे होता. कारण अशा प्रकारच्या वेस्टेज मेणाने गोदामे भरलेली होती. बऱ्याच विचारांती त्यांनी यापासून पुन्हा नविन मेणबत्या तयार करायला घेतल्यात. पण त्यामध्ये विविध प्रकारचे रंग व प्रकार असल्याने व ते सगळे एकत्र मिसळल्या गेल्याने त्यापासून बनविलेल्या मेणबत्या दिसायला चांगल्या नव्हत्या. पुन्हा विचार-चिंतन सुरु झाले. शेवटी त्यामध्ये काळा रंग मिसळून संपूर्ण काळ्या रंगाच्या मेणबत्त्या तयार करण्यात आल्यात व त्या विक्रीसाठी दुकानांमध्ये पाठविल्यात. बरेच दिवस झालेत तरी त्या तशाच पडून होत्या. काळ्या रंगामुळे त्यांना ग्राहकच मिळेना. पुन्हा भावेशची चौकटीबाहेर विचार करण्याची सवय कामी आली. त्याने असा प्रचार करणे सुरू केले की या काळ्या रंगाच्या मेणबत्त्या वातावरणातील सर्व नकारात्मक गोष्टींना दूर ठेवतात ! आणि झाले ! ज्या मेणबत्त्यांना एकही ग्राहक घेत नव्हता, त्या मेणबत्त्यांना इतकी मागणी आली की पुढले काही महिने त्यांना बाकी सर्व कामे बंद ठेवून, केवळ वेस्टेजमधूनच नाही, तर नविन मेणापासून फक्त काळ्या रंगाच्याच मेणबत्त्या बनवाव्या लागल्यात.
भावेशच्या वाटचालीत त्याची पत्नी
नीता हिचा पण
बरोबरीचा वाटा आहे.
तिने भावेशकडे तो
दृष्टीहिन आहे अशा
नजरेने कधीच बघितलेले/वागवलेले नाही. त्यामुळे
पण स्वत:च्या
दृष्टीहिनतेच्या मर्यादांवर मात करण्यासाठी
व एक नॉर्मल
व्यक्ती म्हणून जगण्यासाठी भावेशला
मोलाची मदत झाली.
नीताचा खंबीर पाठिंबा व
आयुष्यातील प्रत्येक वळणावर असलेली
भक्कम सोबत यांच्याच
आधारे, एरव्ही डोळस व्यक्ती
पण धजावणार नाही,
अशा प्रकारची नवनवीन
आव्हाने तो स्विकारू
व यशस्वी करू
शकला.
महाबळेश्वर
येथील त्यांच्या कंपनीमधे
तुम्ही त्यांचं काम पाहू
शकता. तसेच त्यांनी
आता महाबळेश्वर येथे
वैक्स म्युझियम पण
तयार केलेले आहे
व अनेक थोर
व्यक्तींचे मेणाचे पुतळे या
संग्रहालयात तयार केलेले
आहेत.
एवढे सगळे यश मिळवूनसुद्धा भावेश व नीता दोघेही अत्यंत नम्र, गोड व प्रेरणादायी व्यक्तीमत्व असलेले आहेत. त्यांना मिळालेल्या सर्वच गोष्टींबद्दल त्यांच्यामध्ये कृतज्ञताभाव, जो हल्ली दुर्मिळ झालेला आहे, अगदी ठासून भरलेला आहे व कदाचित एवढ्या उत्तुंग यशामागे ते एक महत्वाचे कारण असावे. त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छांसह..