Monday, December 12, 2011

माझा शैक्षणिक प्रवास


माझा शैक्षणिक प्रवास
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या जन्मगावीच माझे दहावी-बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले. घरी निम्न मध्यमवर्गीय व्यापारी कुटूंबाची पार्श्‍वभूमी. घरामध्ये कुणी फार जास्त शिकलेले नव्हते. १०+२ या अभ्यासक्रमाची माझी पहिली बॅच. १९७५ साली दहावी, तर १९७७ साली बारावी झालो. अभ्यासामध्ये सुरवातीपासून चांगला होतो. चौथी व सातवीला स्कॉलरशिप परिक्षा गुणवत्ता यादीमध्ये पास झालो. दहावीला नागपूर बोर्डातून गुणवत्ता यादीत १६ वा क्रमांक व संपूर्ण बोर्डातून मराठीमध्ये प्रथम, गणितामध्ये द्वितीय, तर विज्ञानामध्ये तिसरा क्रमांक आलेला. बारावीच्या परिक्षेत सुध्दा गुणवत्ता यादीमध्ये पास झालो. पुढे नागपूर शासकीय महाविद्यालयामधून एमबीबीएस ही पदवीसुध्दा प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालो.
मागे वळून पाहिले असता हे जे काही शैक्षणिक यश मी मिळवू शकलो, त्याची कारणे काय असावीत याचा विचार करतो तेंव्हा काय वाटते ते तुमच्याशी शेअर करतोय. माझे गाव सिंदखेडराजा हे तसे आडवळणाचे, जेमतेम ८००० लोकवस्तीचे. आता तालुक्याचे केंद्र झालेय. तेंव्हा तालुका सुध्दा नव्हता१९७५ साली म्हणजे आज पासून ३७ वर्षांपूर्वी इतर कुठल्याही आधुनिक सोयी-सुविधांचा अभाव, फारशा मार्गदर्शनाची शक्यता तर नव्हतीच. मग असे असतांना १०-१२ वी ला आणि पुढे सुध्दा जे यश मी मिळवू शकलो याची कारणे शोधली असता एक लक्षात येते, ते म्हणजे लहानपणापासून वाचनाची असलेली आवड. त्याकाळात सिंदखेडराजासारख्या छोट्याशा आडवळणाच्या गावात वाचायला तरी काय मिळणार ? पण घरी किराणा दुकाण असल्याने सामान बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राची रद्दी भरपूर असायची; त्यातून शनिवार-रविवारच्या पुरवण्या काढून वाचायचो. पुढे सातवी-आठवीमध्ये असतांना रहस्यमय कांदबर्‍या वाचायला लागलो. त्याकाळात बाबुराव अर्नाळकरांच्या झुंजार, काळापहाड इ. रहस्यकथा लोकप्रिय होत्या. १००-१५० पानांचे पुस्तक साधारणत: तासाभरात वाचून होत असे. नववीमध्ये असतांना हिंदी वाचनाची सुरूवात झाली. गुलशन नंदा, रानू इ. लेखकांचे उपन्यास त्याकाळी चलनात होते. दहाव्या वर्गात असतांना अशी निदान १०० तरी पुस्तके मी वाचली असतील. घरचे रागावतील म्हणून अभ्यासाच्या वही-पुस्तकामध्ये लपवून वाचायचो. २००-२५० पानांचे पुस्तक दोनेक तासात वाचून संपवायचो. ही जी वाचनाची आवड होती, त्यामुळेच वाचनाचा वेग वाढला, शब्दभांडार समृद्ध झाले व अभिव्यक्ती पण सुधारली असावी. त्यामुळेच कदाचित मराठी विषयामध्ये बोर्डात प्रथम क्रमांक मिळवू शकलो. हे केवळ मराठी विषयाच्या अभ्यासाने नक्कीच शक्य झाले नसते.
दहावीला गणितामध्ये १४९ मार्क मिळवून बोर्डात दुसरा क्रमांक होता. हे पण केवळ गणिताच्या पुस्तकाच्या अभ्यासाने घडले नाही. तर घरी दुकान होते. समोर दुकान व मागे घर असल्याने अगदी लहानपणापासून दुकानात बसावे लागायचे. ग्राहकांशी व्यवहार करतांना हिशोब करावा लागायचा. तोही बहुतेक वेळा तोंडी, कॅल्क्युलेटर वगैरे तर त्याकाळी पोहचलेलेच नव्हते. माझ्या वडीलांचा हिशोब तर अगदी तोंडपाठ असायचा. कितीही अंकी बेरजा ते अगदी झटक्यात व बिनचूक करायचेत. त्यांच्या प्रभावाने हिशोब जलदगतीने व न चुकता करायला शिकलो. आठवीत असतांना शाळेमध्ये संचयनी ही विद्यार्थ्यांची बचत बँक हि योजना नव्यानेच सुरू झाली होती, तिचा मॅनेजर म्हणून काम केले. या सर्वांचा फायदा गणित विषयाच्या अभ्यासासाठी सहजच झाला. म्हणूनच कदाचित गणित हा विषय माझा नेहमीसाठीच अतिशय आवडता राहिला. गणित विषयाच्या आवड व अभ्यासाने एकूणच माझ्यामध्ये असलेली हिशोबी वृत्ती विकसित झाली असावी व त्यामुळेच आयुष्यातील बर्‍याच गोष्टी काटेकोर व हिशोबाने करण्याची सवय लागली.
विज्ञान या विषयामध्ये १४७ मार्क घेवून बोर्डात ३ रा क्रमांक होता. त्याचेही कारण केवळ विज्ञानाच्या पुस्तकांचा अभ्यास नाही; तर निरीक्षण व प्रयोग करून पाहण्याचा छंद. आठवीपासून माझ्या घरी माझी स्वत:ची भंगार सामानामधून उभारलेली छोटीशी प्रयोगशाळा होती. या प्रयोगशाळेत भौतिक, रसायन व जीवशास्त्राचे बहुतेक सर्व प्रयोग मी स्वत: केल्याचे आज ४० वर्षांनतरही मला स्पष्ट आठवते. त्यामुळे विज्ञानाचा अभ्यास हा खेळाचा व आनंदाचा भाग झाला व त्याचे रुपांतर मार्कांमध्येही झाले. त्याशिवाय यातून वैज्ञानिक दृष्टी विकसित झाली, निरीक्षण व प्रयोगशीलता ही विज्ञानाचा अभ्यास करण्याची मूलभूत साधने हाताळण्याचे कसब प्राप्त झाले; प्रत्यक्ष जीवनाच्याही प्रयोगशाळेत त्यामुळे नानाविध प्रयोग करता आलेत व जगणे सुध्दा आनंद व खेळ झाले. कोणत्याही प्रश्‍नाचा शास्त्रीय दृष्टीने विचार करून उत्तरे शोधण्याची सवय लागली. समस्येला समस्या न मानता चॅलेंज म्हणून बघायला शिकलो. अशा आव्हानांना सामोरे जातांना स्वत:च्या क्षमतांचा शोध घेवून त्या विकसित करता आल्यात.
याच सवयी व वृत्ती पुढे १२ वी व मेडीकल कॉलेजमध्येही कायम राहिल्याने नेहमीच अभ्यास एन्जॉय करू शकलो. बहुतेक अभ्यासाची पुस्तके पण कथा-कादंबर्‍या वाचल्यासारखा आनंद देवून जायचीत. त्यामुळे अभ्यासाचे ओझे कधी वाटले नाही व फक्त परिक्षेमध्ये मार्क मिळविण्याच्या हेतूने पण कधी अभ्यास केला नाही.
आता कोणतीही परिक्षा द्यायची नसली तरी अभ्यासाची हीच सवय कायम आहे. आजही वर्षाला विविध विषयांचे, इंग्रजी, मराठी व हिंदी या तीनही भाषांमधील साधारणपणे ४०००० पेजेस वाचतो. त्यामुळे आनंद तर मिळतोच; शिवाय जगाच्या बरोबर राहता येते. 
यावेळी एवढेच. याच प्रवासातील काही अनुभव पुढच्या वेळी .......
(१ नोव्हेंबर पासून दर आठवड्याला काही तरी लिहायचे ठरवले होते. पण अजून सवय पक्की व्हायची आहे. आतापर्यंत तीन लेख लिहून झालेत. शतायुषी होण्यासाठी ! सदा तरुण राहण्यासाठी !, आपले वजन:आपल्या जीवनशैलीचे निदर्शक, व उपाशी न राहता वजन कमी करा, काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या  मागील ४० दिवसात जवळपास २७०० भेटी ब्लॉगला झाल्यात. आपण सर्वांचा जो उदंड प्रतिसाद मिळातोय, तो मला आळस झटकून लिहिणे सुरु ठेवायला भाग पाडत आहे.
आता मी माझ्या आयुष्यातील काही अनुभव, काही लर्निन्ग्स तुमच्यासोबत शेअर करण्याचे ठरवीत आहे. माझा शैक्षणिक प्रवास या आताच्या लेखात मला मिळालेल्या शैक्षणिक यशाकडे मागे वळून पाहताना काय वाटते ते लिहिले आहे. कदाचित यापैकी काही तुम्हाला पण उपयोगी पडू शकतील. प्रतिसादाच्या प्रतीक्षेत.)
Post a Comment

भावेश भाटिया, महाबळेश्वर : डोळस अंधत्व

भावेश भाटिया, महाबळेश्वर  २०१० मध्ये मी , माझी पत्नी सोहिनी व मुलगा अपार सातारा येथे एका  कार्यक्रमानिमित्त  गेलेलो होतो ....