श्री. सचिन
बुरघाटे, अकोला
जिल्हा परिषद शाळेमध्ये सातव्या वर्गात शिकणाऱ्या सचिनला सातपैकी चार विषयात ३५ तर दोन विषयात ३६ मार्क्स मिळाले
होते. हा आरंभबिंदू असणारा ५२३ लोकसंख्येच्या अकोला जिल्ह्यातल्या एका खेड्यातील
हा मुलगा वयाच्या २५-३० मध्येच हजारो व्यावसायिकांना इंग्रजी व व्यक्तिमत्तव
विकासाचे धडे देणारा, तरुण यशस्वी उद्योजक व प्रभावशाली वक्ता/प्रशिक्षक बनतो अशी गगनभरारी घेणाऱ्या सचिनची हि
संघर्षमय व प्रेरणादायी जीवनकहाणी.
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील ५२३ वस्तीचे लाडेगाव हे सचिनचे
गाव. आईवडील जेमतेम दुसरा वर्ग शिकलेले. इंदिरा आवास योजनेअंतर्गत मिळालेले सरकारी
झोपडीवजा घर. इतरांच्या शेतात कामाला जाऊन रोजीरोटी कमविणे; जोड म्हणून सचिनच्या वडिलांनी एक छोटेसे घरगुती किराणा दुकान पण सुरु
केलेले. सचिन गावच्याच जिल्हा
परिषदेच्या शाळेत शिकला. अभ्यासात अगदीच सर्वसाधारण व इतरही कुठल्याच बाबतीत काही विशेष सांगावे अशी ओळख नसलेला सचिन कसाबसा ३५
टक्के मार्क मिळवून सातवी पास झाला. तो आठवीत असताना घडलेल्या एका छोट्याशा घटनेने
त्याच्या आयुष्यात बदलाला सुरुवात झाली असे तो सांगतो. त्याच्या गणिताच्या
शिक्षकांनी त्याला पुढे बोलावून एक गणित सोडवून दाखविले व आता तू हे इतर मुलांना समजावून
सांग असे सांगितले. बस, एवढेसे प्रोत्साहन सचिनसाठी ठिणगी
ठरले. त्याला वाटले कि ज्याअर्थी शिक्षकांनी मला हे करायला सांगितले याचा अर्थ मला
गणित येते व आपण काही स्वतःला समजतो तसे अगदीच टाकाऊ नाही आहोत. त्या दिवसापासून आपल्यामध्ये काहीतरी वेगळे आहे हे त्याच्या लक्षात आले.
तो नेटाने अभ्यास करायला लागला व दहावीला चक्क ५५ टक्के मार्क्स घेऊन पास झाला.
एवढे मार्क्स मिळविणे म्हणजे त्याच्या दृष्टीने बरीच मोठी प्रगती होती.
घरची आर्थिक
परिस्थिती चांगली नसल्याने अभ्यासात हुशार असलेल्या लहान भावाने शिक्षण घ्यावे व
सचिनने घरचे किराणा दुकान सांभाळावे असे वडिलांनी सुचविले. किराणा सामान
आणण्यासाठी एवीतेवी १०-१२ किमी अंतरावरच्या तालुक्याच्या गावी सायकलने जावे
लागायचे. मग तेथे असलेल्या महाविद्यालयात अकरावीला प्रवेश घ्यावा असा त्याने विचार
केला. सकाळी ११ पर्यंत दुकान चालवायचे, त्यानंतर अकोटला येऊन कॉलेज करायचे व परत जाताना दुकानासाठी लागणारे
किराणा सामान घेऊन जायचे व संध्याकाळी पुन्हा दुकान चालवायचे, अशी व्यवस्था होऊन सचिनचे शिक्षण सुरु राहिले. त्याचे गणित जरा बरे
असल्याने व दुकान चालवीत असल्याने अकाउंट्स या विषयात त्याला आवड निर्माण झाली.
अकरावीला सत्र परीक्षेत एका विषयात त्याचा वर्गातून पहिला नंबर येऊन १० रुपयांचे
पेन त्याला बक्षीस मिळाले. सचिन सांगतो, "ऊस दिन जैसेही
सरने ये घोषित किया कि मेरा पहला नंबर आया है और बक्षीस लेने हेतू मुझे सामने
बुलाया तब जिंदगीमें पहली बार अपने आपसे मुलाकात हो गई. ज्यादातर हमें तो अपने
आपसे मिलनेका समय हि नही मिलता, इसीलिये हमे खुदकी हि असली
पहचान नही होती है". या नवीन ओळखीमुळे सचिनची अभ्यासाची गोडी वाढली. बारावीत
त्याला खूपच चांगले मार्क्स मिळालेत. त्यावेळच्या रूढीप्रमाणे त्याने डीएड करावे
असा आग्रह वडिलांनी धरला व त्याला नागपूरला प्रवेश दिला. मात्र सचिनचे मन त्यात
रमले नाही व दोन महिन्यातच तो हट्टाने डीएड सोडून घरी परत आला. त्यामुळे
रागावलेल्या वडिलांनी त्याच्याशी बोलणेच बंद केले. वडिलांचे आपल्याबद्दल झालेले हे
नकारात्मक मत कधीतरी बदलावे यासाठी जिद्दीने तो पेटून निघाला व आमूलाग्र बदलला.
मात्र वडिलांचे मत बदलण्यासाठी त्याला सहा वर्षे वाट
बघावी लागली.
सचिनने
अकोटलाच बीकॉमला प्रवेश घेतला. येथेच त्याने आयुष्यातील पहिले भाषण दिले. हळूहळू
आत्मविश्वास वाढत गेला व सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन तो इंग्रजीमध्ये करायला लागला. लवकरच वक्ता म्हणून त्याची ओळख निर्माण झाली. पुढच्या शिक्षणासाठी थोडे
पैसे मिळावेत यासाठी त्याने याच काळात एसपीएस कोचिंग क्लास सुरु केला. त्याच्या
शिकविण्याचा अनेकांना फायदा होत गेला व जर सचिनने
शिकविले तर कोणी नापास होणार नाही अशी त्याची ख्याती झाली. बीकॉम पूर्ण झाल्यावर
पुण्याला एमबीए करायला जाण्याचे ठरविले. पैशांची बोंब होतीच. मित्र-परिचितांकडून
पैसे जमा करून जाण्याची सोय झाली. दीड वर्षे केवळ एकवेळचे खाऊन शिक्षण पूर्ण केले.
आळंदी रोडवरच्या गजानन महाराज मंदिरात आरतीनंतर प्रसाद म्हणून खिचडी मिळायची,
म्हणून तो व त्याचा मित्र दर गुरुवारी प्रसादाच्या रांगेत उभे राहून
मिळालेल्या प्रसादामध्ये पोटाची भूक भागवू लागले. मात्र पुढे नोकरी मिळाली व पहिला
पगार मिळाला तेंव्हा पण ते रांगेमध्ये उभे होते, फक्त
त्यादिवशी आजचे अन्नदाते म्हणून सचीन व त्याच्या मित्राचे नाव समोर बोर्डावर
लिहिलेले होते. आपल्याला मिळालेले काही अंशी समाजाला परत करण्याची वृत्ती
तेंव्हापासूनच त्याच्यामध्ये जोपासल्या गेली.
दोन वर्ष
कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी केल्यानंतर मात्र आपल्या भागातील लोकांना आपली जास्त
गरज आहे व शिकविणे हि आपली प्याशन आहे हे लक्षात आल्याने २००९ साली नोकरी सोडून
अकोला येथे परत येण्याचा धाडसी निर्णय त्याने घेतला. इंग्रजी भाषेची भीती
घालविण्यासाठी व केवळ इंग्रजी येत नसल्याने आत्मविश्वास कमी राहतो व इतर सर्वकाही असूनही
आपण मागे पडतो या स्वतःच्या वाटचालीतील अनुभवामुळे त्याने अकोल्याला इंग्रजी भाषा शिकविण्यासाठी 'अस्पायर' नावाची
संस्था सुरु केली. भाषा शिक्षणाची सहज पचनी न पडणारी हि त्यावेळची सर्वस्वी नवीन
संकल्पना, २००९
मध्ये केवळ १३ प्रशिक्षणार्थीना घेऊन सुरु झालेला प्रवास, आज रोजचे १५००-२००० विद्यार्थी येथपर्यंत येऊन
पोहचला आहे. गेल्या ८ वर्षांमध्ये 'अस्पायर' द्वारा
४०००० डॉक्टर्स, वकील, सीए, गृहिणी, ज्येठ नागरिक व
विद्यार्थी अश्या सर्वानाच इंग्रजी भाषा व सॉफ्ट स्किलसचे प्रशिक्षण दिले गेले
आहे. केवळ जिद्द, आत्मविश्वास व अफाट मेहनतीच्या जोरावर हे शक्य
झाले आहे. आज सचिन हजारोंचा आयकॉन बनलेला आहे. त्याच्या
विद्यार्थ्यांमध्ये तीनही पिढ्याचे प्रतिनिधी असतात. यातून अनेकांची आयुष्य बदलू
शकलीत. सामान्य लोकांनाही शक्य व्हावे यासाठी अतिशय माफक शुल्क आकारून 'अस्पायर' अनेकांचे आयुष्य बदलन्याचे
काम करीत आहे.
देश विदेशातील तीन लाखपेक्षाही जास्त श्रोत्यांसमोर व तेही
मुख्यत्वे इंग्रजी/हिंदी भाषेमध्ये विविध विषयावर मुख्य वक्ता म्हणून सचिन
बोललेला. स्वतःच्याच गावात तिकीट लावून नियमितपणे हजारो
लोक त्याचे भाषण ऐकायला येतात, कदाचित कुठल्याच वक्त्याला न
जमलेला हा चमत्कार त्याने करून दाखविलेला आहे.
तिशीमध्येच एवढे मोठे यश मिळवूनही, सचिन आताही
अतिशय विनम्र व सौजन्यशील आहे. उलट सामाजिक बांधिलकीसुद्धा जपत, गावांमधील
शेकडो गरीब मुलामुलींना विविध प्रकारे स्वतःच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी व स्वतःच्या
पायावर उभे राहण्यासाठी तो सातत्याने मदत-मार्गदर्शन करीत असतो.
समजत नसणाऱ्या वयात कधीतरी त्याला विचारल्या गेलेल्या तू कशासाठी
जन्म घेतलाय या प्रश्नाचे त्याने त्यावेळी दिलेले उत्तर पुढील आयुष्यात खरे करून
दाखविले. ते उत्तर होते "ये पृथ्वी हमारे बगैर अधुरी है, ऊस अधूरेपन को दूर करने के लिये हम पैदा हुए है"
संपर्क :Aspire- The Institute of Human Development Sahakar Nagar, Gaurakshan Road, Akola
Office: 8275726017/16
Email: sachinburghate@gmail.com
URL: www.aspire.ihd.com
No comments:
Post a Comment